कुणी चोरतो न्यूड फोटो, तर कुणी आणले NASA च्या नाकी नऊ; 5 कुख्यात हॅकर्स

कुणी चोरतो न्यूड फोटो, तर कुणी आणले NASA च्या नाकी नऊ; 5 कुख्यात हॅकर्स

इंटरनेट, तंत्रज्ञान आणि संवादाने मानवी आयुष्य दिवसेंदिवस आणखी सोपे होत आहे. पण, काहींसाठी हेच तंत्रज्ञान एक घातक शस्त्र आहे. आपल्या हातातील मोबाईल किंवा घरातील कंप्युटर केवळ आपल्याच नियंत्रणात असल्याचे वाटत असेल तर तो निव्वळ एक गैरसमज आहे. आम्ही अशा काही हॅकर्स आणि सायबर हल्लेखोरांबद्दल बोलत आहोत जे तुमचे आमचे मोबाईल आपल्यालाही न कळता सहज हॅक करून शकतात. यांच्यासाठी जगातील सर्वात नावाजलेली स्पेस एजंसी नासाचे संगणक हॅक करणे अवघ्या काही मिनिटांचा खेळ आहे. जोनाथन जेम्समुळे नासाला आपले नेटवर्क 3 आठवडे बंद ठेवावे लागले. तर रियान कॉलिन्सने प्रसिद्ध हॉलिवुड अभिनेत्रींच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून त्यांचे न्यूड फोटो हॅक करून लीक केले होते.

सिलेब्सचे न्यूड फोटो लीक करणारा रियान कॉलिन्स
रियान कॉलिन्सला जगातील सर्वात घातक हॅकर मानले जाते. WashingtonTimes च्या एका वृत्तानुसार, रियानने Hunger Games आणि X Men ची अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स आणि केट अपटन सारख्या सेलिब्रिटीजचे न्यूड फोटोज त्यांच्याच मोबाईलमधून लीक केले होते. यासाठी त्याला शिक्षा देखील झाली. त्याने सेलिब्रिटीजचे आयफोन आणि गुगल पासवर्ड चोरून घरबसल्या त्यांचे फोटोज आणि व्हिडिओ आपल्याकडे डाऊनलोड केले. त्यामध्ये डिलीट केलेल्या न्यूड फोटोजचा देखील समावेश होता. साऱ्या हॉलिवूड जगतात त्याच्या नावाची भिती पसरली होती.

जोनाथन जेम्स
हॅकर जोनाथन जेम्सने नासाच्या नाकी नऊ आणले होते. जोनाथन अमेरिका सरकारची संकेतस्थळे आणि नेटवर्क हॅक करताना नासाच्या डेटाबेस पर्यंत पोहोचला होता. त्याने अमेरिकन प्रशासनासह नासाच्या अंतराळातील मोहिमांची माहिती आपल्याकडे डाऊनलोड केली होती. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्तानुसार, या घटनेनंतर प्रचंड घाबरलेल्या नासाच्या संशोधकांनी आपले डेटाबेस नेटवर्क 3 आठवड्यांसाठी बंद ठेवले होते. यानंतर तो पोलिसांच्या हाती आला. पण, आरोप फेटाळून आत्महत्या केली.

अॅलबर्ट गोंसालेज
या हॅकरने कोट्यावधी लोकांना कंगाल केले आहे. गोंसालेजकडे 17 कोटी क्रेडिट कार्डचे डीटेल्स आहेत. जे विकून त्याने कोट्यधींची कमाई केली आहे. एवढेच नव्हे, तर तो लोकांना बनावट पासपोर्ट, आरोग्य विमा, जन्माचा दाखला आणि अनेक प्रकारचे प्रमाणपत्र तयार करून द्यायचा. त्याने तयार केलेला प्रमाणपत्र खोटा असल्याचे कुणीच सांगू शकत नव्हते. या कृत्यांसाठी तो 20+20 वर्षांची शिक्षा भोगतोय.

केव्हिन मिटनिक
केव्हिन मिटनिकला सर्वात कुख्यात हायटेक गुन्हेगार म्हटले जाते. तो कुठल्याही मोठ्या सीक्रेट प्रोजेक्टला सहज हॅक करत होता. त्याने अमेरिकेच्या सिक्युरिटी अॅलर्टमध्ये घुसखोरी केली होती. अमेरिकेच्या कॉर्पोरेट सीक्रेट त्याने कुणालाही न कळता चोरले होते. त्यामुळे, त्याला 25 वर्षांची कैद सुनावण्यात आली. शिक्षा सुरू असतानाच तो कंसल्टंट बनला आणि सायबर संरक्षणाचे सल्ले देत आहे. केव्हिनवर हॉलिवुडपट देखील बनला आहे.

केव्हिन पॉलसन
केव्हिनने एका रेडिओ स्टेशनची यंत्रणा हॅक केली होती. असे करून त्याने एक शो जिंकला. क्विझ शोचे पारितोषिक म्हणून त्याला पॉर्श सुपरकार मिळाली होती. तेव्हापासून तो एफबीआयच्या नजरेत आला. त्याने एफबीआयलाही सोडले नाही. संघीय तपास संस्थेचेही सिस्टिम हॅक केले. त्याला 51 आठवड्यांची शिक्षा झाली होती. बाहेर आल्यानंतर तो अमेरिकन पोलिसांना हॅकर्स विरोधात मदत करत आहे.